News

जालना: जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने दि. 5 डिसेंबर रोजी बदनापुर व जालना तालुक्यातील गावांना भेटी देऊन केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली.

Updated on 07 December, 2018 7:52 AM IST


जालना:
जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने दि. 5 डिसेंबर रोजी बदनापुर व जालना तालुक्यातील गावांना भेटी देऊन केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली.

केंद्र शासनाच्या या पथकामध्ये निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, यांचा समावेश होता तर पाहणी दरम्यान पथकासमवेत जलसंधारण विभाग (वाल्मी) औरंगाबादचे आयुक्त दीपक सिंघला, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, तहसिलदार बिपीन पाटील, बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार आदींची उपस्थिती होती.

सर्वप्रथम पथकाने बदनापुर तालुक्यातील जवसगाव या गावाला भेट देत या गावातील शेतकरी श्रीमती सुवर्णा सुखदेव अंभोरे यांच्या शेतामधील कापूस पिकाची पाहणी केली. तद्नंतर जालना तालुक्यातील बेथलम या गावातील शेतकरी प्रकाश जयसिंग निर्मल यांच्या शेतातील ज्वारी पीकाची पहाणी केली.

यावेळी पथकातील सदस्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत किती दिवसापासुन पाऊस नाही, पीकाची पेरणी कधी केली, गतवर्षात किती उत्पन्न मिळाले होते, यावर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे, पीकविमा भरला होता काय तसेच बँकेकडून पीकांच्या लागवडीसाठी कर्ज घेतले होते काय आदी माहिती विचारली. तसेच आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही पीक परिस्थितीबाबत पथकाला माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा, टंचाईच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना, टंचाई आराखडा, रोहयोच्या माध्यमातून मजुरांना काम यासह दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्रीय पथकाला माहिती दिली. पथकाने भेट दिलेल्या दोनही गावात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

English Summary: Inspecting the drought situation in the district by the Central government team
Published on: 06 December 2018, 02:00 IST