अहमदनगर- शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज अतिशय महत्वाचा असतो. पीक नियोजनाचं भवितव्य पावसाच्या अंदाजावर अवलंबून असते. हवामान खात्याने लावलेले पावसाचे अंदाज कधीकधी जुळत नाही. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातला शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र, सध्या हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख (panjabrao dakh) यांचा सर्वत्र डंका आहे.
पाऊस कधी व किती पडणार याचा डख यांनी वर्तविलेला अंदाज शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो आहे. एकवेळ हवामान विभाग चुकेलं पण पंजाबराव डख नाहीत अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील आहे. पेशाने अंशकालीन शिक्षक असलेल्या डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रभर होत आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकर्यांचे प्रबोधन करत आहेत.
कुतूहलातून हवामानाचा अभ्यास:
पंजाब डख हे शेतकरी कुटुंबातील आहेत. जिज्ञासू स्वभावाचे डख लहानपणापासून टिव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या ते वडिलांबरोबर कायम पाहत असायचे. हवामानाच्या अंदाजावर आपल्या वडिलांसोबत सातत्याने चर्चा करायचे. हवामान विषयात आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी तांत्रिक गोष्टी जाणून घेण्यास सुरुवात केली. सी-डॅक (C-DAC) हा संगणक संबंधित अभ्यास पूर्ण केला. अभ्यासक्रमात त्यांना उपग्रह, अवकाश याविषयीचे बारकावे समजावून घेण्यास मोलाची मदत झाली. त्यानुसार अंदाज व्यक्त करण्याची आवड लागली.
पंजाबराव डख हे आपला हवामानाचा अंदाज व्हॉट्सअॅपद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. आपल्या घरात बसून अख्खा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज लावण्याची किमया डख यांनी साधली आहे.
हवामानाचा अंदाज खरा ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजासोबत शेतकरी डख यांनी वर्तविलेल्या अंदाजाची पडताळणी करतात.
हवामानाचं ‘डख’ मॉडेल:
हवामान विभागाप्रमाणे पंजाबराव डख आपला वार्षिक अंदाज देखील जाहीर करत असतात. शेतकऱ्यांना वार्षिक पीक नियोजन सोयीचे ठरावे या उद्देशाने शेतकऱ्यांपर्यंत हवामाच्या अंदाजाची माहिती पोहचवतात. पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज वर्तविण्याचे मॉड्यूल विकसित केले आहे. तंत्रज्ञानासोबतच काही नैसर्गिक घटकांचा देखील त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
Published on: 12 September 2021, 01:50 IST