राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तूर, गहू, मका, कांदा आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागिल हंगामात पाऊस कमी झाल्याने हवे तसे उत्पादन आले नाही. तोच आता अवकाळी पावसाने हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात डाळींचा तुटवडा निर्माण होवून पीठ आणि डाळींच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसू शकतो.
मागिल काही वर्षांमधील पावसाची अनियमीतता आणि वातावरणातील बदलांमुळे विविध रोगांचा वाढत जाणारा प्रार्दुभाव यामुळे गहू आणि डाळींच्या पेरण्या पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. आतापर्यंत गव्हाच्या पेरणीत 5 टक्क्यांहून अधिक घट झाली असून डाळींच्या पेरणीत आठ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र, पावसानंतर ही कमतरता भरून काढता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे देशातील महागाई आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
आता लवकरच नवी तूर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. सध्या बाजारात तुरीला सरासरी १० हजारांचा भाव मिळत असून मागील हंगामातील दुष्काळ आणि या हंगामातील अवकाळी पावसामुळे गहू, तूर आणि इतर कडधान्यांचे नूकसान झाल्याने आवक कमी होवून बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. आवक कमी झाल्यानंतर तूरीची भावपातळी पुन्हा १० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता असून सामान्यांच्या खिशाला माहागाईची झळ बसणार आहे.
Published on: 02 December 2023, 12:56 IST