Soybean News :
राज्यातील सोयाबीन पिकावर यलो मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. यामुळे सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. काही भागातील सोयाबीन पाण्याअभावी वाळू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहेत.
मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनवर जास्त प्रमाणात यलो मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतातील सोयाबीन पीक पिवळी पडली आहेत. तसंच सोयाबीनला लागल्या शेंगा देखील पिवळ्या पडून वाळू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीनवर उंट अळीचा देखील प्रादुर्भाव झाला. त्यातून कसेबसे पीक वाचवले तर आता यलो मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वर्धा, यवतमाळ, वाशिम, नागपूर या जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे.
मोझँक रोगापासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी देखील करत आहेत. पण पाण्याची समस्या, वाढते तापमान याचा देखील फटका पिकाला बसत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तसंच गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाढ होत चालली आहे. पण यंदा सोयाबीनवर मोझँकने हल्ला केला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
Published on: 21 September 2023, 04:27 IST