दिवसेंदिवस मराठा आंदोलन उग्र होत चालले आहे. जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. जरांगे यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, कँडल मार्च निघत आहेत, सार्वजनिक वाहने फोडली जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पाठिंबा मिळत आहे. आता इंदुरीकर महाराज यांनीही मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
इंदुरीकर महाराज यांनी आजवरचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. इंदुरीकर महाराज यांनी उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला आहे.
तसेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत काय निर्णय घेण्यात येतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Published on: 30 October 2023, 12:18 IST