सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे गाव नुकतेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ‘मधाचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. देशातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. मांघर येथील ‘मधाचे गाव’ हा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तो राबविला जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधमाशी पालनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिकृतपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मधमाशी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मांघर या पहिल्या मधाच्या गावाचा अधिकृतपणे प्रारंभ होत आहे. या गावातील ८०% लोकांचा उदरनिर्वाह मध उद्योगावर अवलंबून आहे.
त्यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मध आरोग्यासाठी फायदेशीर असून, पुढील पिढी निरोगी ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेद्वारे शालेय पोषण आहारात मुलांना एक चमचा मध देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना देसाई यांनी केली. जगातील मधमाशांची संख्या कमी होत आहे. ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. वनविभागाने रोपांची संख्या वाढवावी, त्याचा उपयोग मध संकलनासाठी होईल.
हा एक कृषी व्यवसाय देखील असू शकतो. मधमाश्या निसर्गाचा समतोल राखतात. तसेच फुलांच्या परागीभवनामुळे पीक उत्पादनात वाढ होते. या संकल्पनेमुळे शुद्ध मध बाजारात उपलब्ध होणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ शेतकऱ्यांना प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मदत करेल, असे मंत्री देसाई म्हणाले.
यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, प्रांताधिकारी संगिता चौघुले, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, , ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सरपंच यशोदा संजय जाधव आदी उपस्थित होते.
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणांतर्गत मांघर गावाचा प्रचार करावा. येथे येणार्या पर्यटकांना येथे मधमाशी पालन कसे केले जाते, मधावर प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती मिळेल. त्याचबरोबर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
महत्वाच्या बातम्या
IMD Monsoon News : पुढील चार दिवस महत्वाचे; या भागात होणार जोरदार पावसाचे आगमान
महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२२, आत्ताच अर्ज करा आणि १५ लाख रुपयांची सरकारी ऑर्डर मिळवा
Published on: 19 May 2022, 12:13 IST