News

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. यासोबतच रशियाने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला.

Updated on 25 February, 2022 12:46 PM IST

नवी दिल्ली: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. यासोबतच रशियाने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला. या युद्धामुळे गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अनेक बदल झाले.

भारतात महागाई वाढणार

युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलची किंमत लगेच वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही थेट परिणाम होणार आहे. दीड महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. पण, दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाने 15-17 टक्क्यांची उसळी घेतली आहे. रशिया आणि यूक्रेन वादामुळे सोने, चांदी पासू कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली आहे.

या गोष्टींचा भारतावर होऊ शकतो परिणाम

युक्रेन जगातील सर्वात मोठा शुद्ध सूर्यफूल खाद्यतेल निर्यातदार देश आहे. युक्रेननंतर, या पुरवठ्यात रशियाचा क्रमांक लागतो. दोन देशांमधील युद्ध दीर्घकाळ चालले तर घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. युक्रेनमधून भारतात खतांचा पुरवठा होतो. तो महागण्याची शक्यता आहे. तसेच युक्रेनमधून येणाऱ्या मोती, मौल्यवान खडे, धातू रशियातून आयात केले जातात. स्मार्टफोन आणि संगणक बनवण्यासाठी अनेक धातूंचा वापर केला जातो.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. येथे सुमारे 16-18 टक्के तेलाचे उत्पादन होते. त्याच वेळी रशिया आणि सौदी अरेबिया 12-12 टक्के उत्पादन करतात. 3 पैकी 2 मोठे देश युद्धसदृश परिस्थितीत समोरासमोर आले तर जगभरातील तेल पुरवठ्यावर परिणाम होईल. जागतिक तणावामुळे तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक आहे.

English Summary: India to bear the brunt of Ukraine-Russia dispute
Published on: 25 February 2022, 12:41 IST