मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानीच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. 21 नोव्हेंबरपर्यंत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती. मात्र अजूनही ऊस प्रश्नावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंर्दभातील एक पोस्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आंदोलना बद्दल माहिती देण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरपासून कोल्हापूर येथील शिरोली पुलावर सकाळी 10:30 वाजता बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यात करण्यात आले आहे.
तसेच १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली होती. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मात्र अजूनही ऊस प्रश्नावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून 23 नोव्हेंबर रोजी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
Published on: 21 November 2023, 05:23 IST