भारतात व महाराष्ट्र राज्यांच्या बहुसंख्य भागात तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर बहुतेक भागात तेलबियांची लागवड कमी अधिक प्रमाणात सगळीकडे केली जाते. त्यामध्ये सोयाबीन, सूर्यफूल, करडई, भुईमूग या तेलबियांचा समावेश होतो. परंतु या सगळ्यांमध्ये भुईमूग हे पीक फार महत्वाचे आहे. भुईमुगाची लागवड शेतकरी एक नगदी पीक म्हणून करत आला आहे. मालेगाव (नाशिक )तालुक्यातील पूर्वेकडील भाग, माळमाथा परिसरात या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. पण मागील सात ते आठ वर्षांचा विचार केला तर भुईमूग लागवडीखालील क्षेत्रात घट झाली.
दरम्यान वरुण राजाची कृपा चांगली होत असल्यामुळे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक, तुषार सिंचनाच्या वापरात वाढ झाल्यामुळे भुईमूग लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षांपासून भुईमूग लागवडीत या भागात वाढ होत असल्याने हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. ठोक रक्कम देणाऱ्या पिकाला शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर का बसवले? याचा विचार केला असता त्यामागे असंख्य कारणे असल्याचे आपल्याला दिसतील, त्यातील काहींचा घेतलेला लेखाजोखा.
मालेगाव (नाशिक )तालुक्यातील पूर्वेकडील भाग, माळमाथा परिसर इत्यादी भागात जवळजवळ उन्हाळी हंगामात 95 टक्के भुईमुगाची लागवड होत होती. विक्रमी प्रमाणात उत्पादन निघत होते. परंतु जवळजवळ मागील 17 ते 18 वर्षांपासून भुईमूग लागवडीत घट झाली. मागच्या वर्षापर्यंत हे प्रमाण जवळजवळ 10 टक्क्यापर्यंत खाली आले. याच्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यात प्रामुख्याने महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात असणारा पाण्याचा तुटवडा. या भागामध्ये सन 2001-2002 यावर्षी भयानक दुष्काळ पडला होता, त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत लक्षणीय घट झाली. विहिरी, बोअरवेलमधील पाणी साठाही खाली गेला होता. तर काही पुर्ण कोरड्या झाल्या होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अशा अवस्थेत उन्हाळी भुईमुगाची लागवड करणे अशक्यप्राय होते. त्यात भुईमुगाचे पीक हे 4-5 महिने राहणारे पीक असून उन्हाळ्यात या पिकाला भरपूर प्रमाणात पाणी लागते. वर उल्लेख केलेल्या वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण साधारणच राहिले.
या अशाही परिस्थितीत बरेच शेतकरी भुईमुगाची लागवड करत राहिले. अडचणींचा सामना करून भुईमुगाचे उत्पादन करत राहिले, परंतु भुईमुगाच्या बाजारभाव कमी मिळत असल्याने उरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातूनही भूईमूगने काढता पाय घेतला. साधरण भुईमुगला मिळत असलेला भाव हा 2000 ते 2500 हजारांच्या खाली होता. त्यामुळे उत्पादन खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे झालेला खर्जही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीकडे पाट फिरवली.
तिसरे महत्वाचे कारण म्हणजे मजुरांचा तुटवडा - भुईमुगाची काढणी करण्यासाठी जास्त प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. भुईमूग उपटणे व शेंगा तोडणे हे फार क्लिष्ट व जास्त कष्टाचे काम आहे. त्यामुळे मजूर सहजासहजी कामावर यायला धजत नाही. पर्यायाने जास्त मजुरी देऊन मजूर कामावर आणावे लागत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो म्हणून घट होण्यामागे हे कारणही आहे. राजकीय धोरणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यापारी घडामोडीचा प्रभावही शेतमालाच्या भावावर परिणामी करतात. मग यात भुईमूगही अपवाद नसावा. परंतु नैसर्गिक व स्थानिक बाबींचा जास्त प्रभाव लागवडीतील घटीमागे कारणीभूत असतो.
मागील वर्षीच्या उन्हाळ्यात जवळजवळ २५-३० टक्क्यापर्यंत भुईमूग लागवड क्षेत्रात वाढ झाली. यावर्षी या भागातल्या मालेगाव कृषी बाजार समिती व सटाणा (बागलाण )कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगास प्रती क्किंटल ५५०० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उन्हाळी भुईमुगाची लागवड वाढण्यासाठी हे एक आशादायी चित्र आहे. येणाऱ्या २-३ वर्षात उन्हाळी भुईमुगाची लागवड वाढून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत येईल, अशी आशा आहे.
Published on: 20 July 2020, 11:35 IST