दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील मध्यम आणि मोठ्या मिळून एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ पाणीसाठा झाला आहे. दरम्यान जून जुलै अखेर पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा धरणे भरतील का नाही याची चिंता सतावत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात सर्वत्र झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
जून आणि जुलैमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. घाटमाथ्यावर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. ऑगस्टमध्ये बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरुन वाहत होते. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. सध्या राज्यातील धरणांमध्ये ७६.९८ टक्के पाणीसाठी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणे भरली , यामुळे उन्हाळ्यात तुलनेने कमी प्रमाणात पाणीटंचाई भासली होती.
गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यांतील सर्व धरणांमध्ये मिळून ६३.९८ टक्के पाणीसाठा होता. चालू वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश धरणांमध्ये तलुनेने चांगला पाणीसाठा झाला आहे. मराठावाड्यातही जुन,जुलै महिन्यात पाऊस कमी झाला होता, पण ऑगस्टमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. मराठवाड्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून सध्या ६३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीत मराठावाड्यातील प्रकल्पांमध्ये अवघा २९.८९ टक्के पाणीसाठा होता.
Published on: 01 September 2020, 04:52 IST