कोरोना या संकटामुळे थांबलेल्या नव्या भाजीपाला लागवडी आता वेग घेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रोपवाटिकांमध्ये ही रोपांची मागणी सुधारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा रोप लागवड कमी असली तरी गेल्या महिनाभरातील वाढत्या मागणीने रोपवाटिका चालकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते जूनच्या तुलनेत जुलैनंतर सध्या रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकांमधून भाजीपाल्याची रोपे राज्यभरात जातात त्यामुळे विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे रोपांची मोठी उलाढाल होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने कोबी फ्लॉवर मिरची त्याचबरोबर झेंडू आधीच्या रोपांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते मे महिन्यानंतर रोपे तयार करण्याची लगबग चालू होत असते. परंतु यंदा कोरोना संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी तयार केलेली रोपे वाया गेली परंतु त्यानंतर आता काही अंशी शेतकऱ्यांचे जनजीवन सुरळीत व्हायला लागले आहे, अशा परिस्थितीत भाजीपाला रोपांच्या मागणीला आता मागणी होऊ लागली आहे. राज्यभरात भाजीपाल्याची क्षेत्र मोठ्या प्रमाणात खाली आल्याने शेतकऱ्यांनी भाजीपालाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून लोकडाऊन शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आपला मोर्चा शेती करण्याकडे ओढवलेला असल्याचे दिसून येते. शेतीपूरक उद्योग म्हणून उभ्या केलेल्या लहान रोपवाटिकाना यंदा मोठा फटका बसला. त्यामुळे अनेकांनी रोपवाटिकेत रोपे तयार करणे कमी केले होते.
गेल्या महिन्यापासून राज्यभरात पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला लागवडीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे रोपांच्या मागणीत हळूहळू वाढ होत चालली आहे. विशेष करून टोमॅटो फ्लॉवरसह अन्य भाजीपाला रोपांना मागणी वाढत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. वाहतुकीचा अडथळा न राहिल्याने कच्चामाल देखील वेळेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची रोपेदेखील गतीने तयार होत असल्याचे पहावयास मिळते. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला रोपांना गेल्या पंधरा दिवसांपासून मागणी वाढली आहे. सध्या पुराची स्थिती असल्याने काहीशी मागणी कमी आहे. पाणी ओसरल्यानंतर येत्या काही दिवसात रोपांना नव्याने मागणी वाढण्याची शक्यता रोपवाटिका चालकांनी व्यक्त केले.
हेही पण वाचा : बियाण्यांची भेसळ रोखणार; शेतकरीच तयार करणार गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे
गेल्या महिन्यापासून भाजीपाला रोपांच्या मागणीला चांगला प्रतिसाद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोपांना मागणी कमी असली तरी सध्या मात्र रोपवाटिका चालकांचे थांबलेले चक्र सुरु झाले आहे. हळूहळू राज्या-राज्यातून रोप मागणीत वाढ होईल असे रोपवाटीका चालक बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या माणिकडोह येडगाव आणि पिंपळगाव जोगे या धरणांमध्ये पाण्याची चांगल्यापैकी आवक होत आहे. त्यामुळे पाण्याच्या दृष्टीने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. गेले चार-पाच महिने कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र भविष्यात शेतात लागवड केलेल्या भाजीपाला उत्पन्नाच्या माध्यमातून काहीतरी हाताला आर्थिक प्राप्ती मिळेल, या आशेवर शेतकरी वर्ग असल्याचे चित्र पाहायला मिळते.
Published on: 16 September 2020, 05:51 IST