पुणे : एका बाजूला ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाचा गजर करत असताना वारीत चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्याप्रकारे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ‘आरोग्यवारी अभियाना’च्या उद्घाटन कार्यक्रमात केले.
भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोगामार्फत पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने आयोजित या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, हेमंत रासने, लक्ष्मी आंदेकर आदी उपस्थित होते.
वारकरी महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने हा उपक्रम चांगला असल्याचे सांगून मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, वारीमध्ये वृद्ध, मुली, गरोदर स्त्रिया तसेच स्तनदा माता अशा सर्व स्तरातील महिला अनेक दिवसांसाठी घरापासून दूर असतात. अशा वेळी सॅनिटरी नॅपकीन वाटपासारखा कौतुकास्पद उपक्रम राबविताना त्यांची धार्मिक, अध्यात्मिक परंपरा जपण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोगाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. या वारीदरम्यान आयोगाकडून २५० पेक्षा जास्त आरोग्य केंद्रे वारकरी महिलांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
कु. तटकरे पुढे म्हणाल्या, यंदाच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात महिलांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी ४ हजार ६०० कोटींची तरतूद केली आहे. अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये डीबीटीद्वारे थेट देण्यात येणार आहेत. या योजनेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲप किंवा गावातील महा-ई सेवा केंद्रे आदी तसेच शहरातील सेतू आदींच्या माध्यमातून १ जुलैपासून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ जुलैपर्यंत नोंदणी झालेल्यांची छाननी करुन १६ तारखेपासून लाभ देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजना, घरटी ३ गॅस सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, महिला बचत गटांना खेळते भांडवल, प्रत्येक आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीची सुविधेसाठी आरोग्य साधने व उपकरणे, कुटुंबाचे ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीनींच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काचा संपूर्ण परतावा अशा अनेक योजनांची तरतूद केली आहे.
पुण्यासह १७ शहरात पहिल्या टप्प्यात महिलांना १९ हजार ई- पिंक रिक्षा देण्यात येणार असून एकट्या पुणे शहरात १ हजार ई- पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत. पुढील काळात उबेर, ओलासारख्या व्यासपीठाशी या रिक्षांची जोडणीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून महिलांनी प्रवासासाठी नोंदणी केल्यास त्यांना महिला चालक असलेल्या ई- पिंक रिक्षातून प्रवास करता येणार आहे.
प्रत्येक वारकरी दिंडीला २० हजार रुपये देण्याचा तसेच वारीचा समावेश जागतिक वारशामध्ये व्हावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे श्री. मोहोळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा अशी विनंतीदेखील त्यांनी केली.
Published on: 02 July 2024, 09:01 IST