मागील वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे व सुलतानी संकटांमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला हमी भावापेक्षा जास्तीचा दर मिळत असल्याने परिसरातील शेतकरी चांगलाच सुखावला आहे. अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू ज्वारी बाजरी सोयाबीन इत्यादी शेत मालाला चांगला बाजारभाव प्राप्त होताना दिसत आहे. शेतमालाला मिळत असलेला बाजार भाव हा यावर्षी सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा अधिक असल्याचे समजत आहे.
जालना जिल्ह्यात खरीप मध्ये पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. पावसाच्या लहरीपणाचा फटका खरिपातील जवळपास सर्वच पिकांना बसला होता, खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त फटका सोयाबीन व कापूस पिकांना बसला होता आणि त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. आता सोयाबीन आणि कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे, सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घटल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी सोयाबीन आणि कापसाला राज्यात विशेषता अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा अधिक दर प्राप्त होत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला होता, मात्र आता शेतमालाला हमी भावापेक्षा अधिक दर प्राप्त होत असल्याने शेतकरी राजा समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे, आवक वाढली की बाजारभावात मोठी घसरण नमूद केली जाते, मात्र अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याउलट होताना दिसत आहे. कारण की बाजार समितीत येत असलेल्या शेतमालाला व्यापाऱ्यांकडून चांगल्या किमतीत खरेदी केले जात आहे. अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला जास्तीत जास्त दोन हजार रुपये एवढा विक्रमी बाजार भाव मिळत आहे, याशिवाय बाजरीला देखील दोन हजार 600 जास्तीत जास्त बाजार भाव मिळाल्याचे समजत आहे. तसेच गहू, तूर, सोयाबीन इत्यादी शेतमालाला हमी भावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला देखील विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे. बाजार समितीत कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर प्राप्त होत आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने कापसासाठी कॉलिटी नुसार 5 हजार 726 ते 6 हजार 25 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जारी केला आहे. मात्र यावर्षी हमीभावापेक्षा अधिक दर कापसाला प्राप्त होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र समोर येत आहे.
Published on: 19 January 2022, 09:22 IST