यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेली आहे, राज्यात देखील यंदा विक्रमी कांदा लागवड बघायला मिळत आहे. राज्यातील पश्चिम भागात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते यावर्षी देखील या भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होतांना नजरेला पडत आहे. सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवड करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड करताना नाकी नऊ आल्याचे चित्र जिल्ह्यात विशेषता प्रवरा तालुक्यात नजरेला पडत आहे. संपूर्ण तालुक्यात कांदा लागवडीसाठी भीषण मजूरटंचाई दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकरी एक्सट्रा रोजंदारी देऊन कांदा लागवड करण्यासाठी मजबूर झाले आहेत. आधीच खत खाद्य, बियाणे इत्यादींवर वाढलेला खर्च आणि आता मजुरीवर वाढणारा खर्च यामुळे कांदा लागवड दरवर्षीपेक्षा यंदा जास्त खर्चिक होताना दिसत आहे.
असे असले तरी शेतकरी बांधव अफाट हालअपेष्टा सहन करून कांदा लागवड करत आहेत, मात्र तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता एक मोठे संकटयेऊन ठेपले आहे. संपूर्ण तालुक्यात हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकाला नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्यामुळे कांदा पिक जोमाने वाढण्याऐवजी त्याची वाढच होत नाही आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर पीळ्या रोग नजरेला पडत आहे. खरीप हंगामात देखील कांदा उत्पादक शेतकर्यांना अशाच संकटांना सामोरे जावे लागले होते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट घडून आली होती.
त्यामुळे खरीप हंगामाची भरपाई रब्बी हंगामातील कांदा पिकातून करावी असा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र आता खराब वातावरणाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवलेले दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच लागवडीसाठी एक्स्ट्रा पैसे मोजावे लागले आहेत आणि त्यात आता संपूर्ण तालुक्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकावर रोगाचे सावट बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकावर महागड्या फवारण्या कराव्या लागत आहेत.
त्यामुळे एकंदरीत कांदा काढणी पर्यंत शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा अधिकचा खर्च लागणार आहे एवढे नक्की. असे असले तरी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या जिगरीने लढताना दिसत आहेत. आता एवढा आटापिटा करून, हाल-अपेष्टा सहन करून लावण्यात आलेला कांदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रडवतो की हसवतो हे बघण्यासारखे असेल.
Published on: 05 January 2022, 10:04 IST