News

भारत एक कृषीप्रधान देश आहे, देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, मात्र असे असले तरी शेतीची सेवा करणारा बळीराजा याची अर्थव्यवस्था सध्या कमालीची ढासळली आहे, देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर जरी असली तरी मात्र बळीराजाची अर्थव्यवस्था खूप दयनीय झाली आहे.

Updated on 24 January, 2022 2:31 PM IST

भारत एक कृषीप्रधान देश आहे, देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, मात्र असे असले तरी शेतीची सेवा करणारा बळीराजा याची अर्थव्यवस्था सध्या कमालीची ढासळली आहे, देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर जरी असली तरी मात्र बळीराजाची अर्थव्यवस्था खूप दयनीय झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून बळीराजा आसमानी आणि सुलतानी संकटांशी झुंज देत काळ्या आईची सेवा करत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा; तर कधी सोन्यासारख्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर; तर कधी शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खत-खाद्य इत्यादींच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील पिके अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दयनीय स्थितीत पोहोचली आहेत, म्हणून पिकांच्या वाढीसाठी अतिरिक्त खत खाद्याची आवश्यकता भासणार आहे. पण ऐन रब्बीच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे, आणि यामुळे पिकांच्या उत्पादन खर्चात देखील वाढ होणार आहे. शेतकरी राजांवर ओढवलेली संकटे कमी होते की काय, म्हणून आता अनेक दलाल लोक शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी तयार असल्याचे चित्र मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अद्यापपर्यंत नव्या खतांचा स्टॉक आलेला नाही मात्र नवे खत येण्याआधीच जुन्या खतांची किंमत वाढवली गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

तालुक्‍यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रात हा गैरव्यवहार चालू असल्याचे समजत आहे, जुन्याच खतांच्या बॅगा नव्या किमतीत तालुक्यात सर्रासपणे विकल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूटमार होत असल्याचे चित्र दिसत आहे. 20:20:00:13 ची 1050 रुपयाची जुनी बॅग नवीन दरात म्हणजे तब्बल 1280 रुपयाला विकली जात आहे. रासायनिक खतांचे नवीन वाढलेले दर कमी होते की काय म्हणून तालुक्यातील काही महाभाग हीच जुनी बॅग 1350 रुपयाला विकत आहेत. म्हणजे जुन्या बॅगेच्या विक्रीतून नव्या बॅगेच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक वसूल करत आहेत. 

तालुक्यात हा प्रकार सर्रासपणे चालू असला तरी प्रशासनाला अद्याप पर्यंत याबाबत माहिती नाही किंवा माहिती असून कार्यवाही करण्याची प्रशासनाची इच्छा नाही अथवा प्रशासनाच्या अन्य काही वैयक्तिक अडचणी असतील! असो कारण कुठले का असेना या सर्व प्रकरणात सर्वात जास्त नुकसान बळीराजाचे होत आहे. आधीच वाढत्या खतांच्या किंमतीमुळे बळीराजा पूर्ण हतबल झाला आहे त्यात ही दिवसाढवळ्या होणारी लूटमार भारत कृषीप्रधान देश नसून कृषीचे शोषण करणारा देश आहे हे दाखवण्यास पुरेसे आहे.

English Summary: in this district old stock of fertilizer sold in new rate (1)
Published on: 24 January 2022, 02:31 IST