मागील दीड वर्षात ७५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या. शेतकरी समित्या, FPOs यांना गोदामं तयार करण्यासाठी, कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याआधी e-NAM द्वारे एक उत्कृष्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
आता कायदा तयार करून शेतकऱ्याला बाजाराच्या वर्तुळातून आणि बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाईल. या निर्णयामुळे शेतकरी त्याच्या शेतात येणाऱ्या उत्पादनांचा थेट सौदा करु शकतो. एवढंच नाही तर सरळ गोदामे, e-NAM शी जोडल्या गेलेल्या संस्था, व्यापारी जे त्याला जास्त किंमत देतील त्यांच्याशी पिकाचा सौदा करु शकतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पीएम किसान योजना ही छोट्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनविण्यात आली आहे.
Published on: 10 August 2020, 07:44 IST