परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडींला प्रतिकारक्षम असुन सघन लागवड पध्दतीतुन उत्पादन वाढ व लांब धाग्याचे वाण विकसीत केल्यामुळे भविष्यात देशी कपाशीखालील लागवडीचे क्षेत्र वाढु शकते. देशी कपाशीत बोंडाची अधिक संख्या व त्यांचा आकार लक्षात घेता भविष्यात कपाशी वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक तथा कापुस तज्ञ डॉ. बसवराज खादी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील देशी कपाशीवरील संशोधन करणारे महेबुब बाग, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राच्या शताब्दीपुर्ती सोहळा दिनांक 7 डिसेबर रोजी संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर पुणे येथील महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीचे अध्यक्ष तथा माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, माजी कापुस पैदासकार डॉ. एस. एस. माने, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, डॉ के एस बेग, डॉ विजयकुमार चिंचाणे, डॉ. यु. जी. कुलकर्णी, महाबीजचे डॉ. प्रफुल्ल लहाने, श्री. अर्जुन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बसवराज खादी पुढे म्हणाले की, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापूस संशोधनात उल्लेखनीय कार्य केले असून केंद्राने विकसीत केलेले जनुकिय बँक देशात इतर ठिकाणी उपयोगात येत आहे. याच केंद्राने लांब धाग्याचे व किडींना सहनशील वाण उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. अशोक ढवण म्हणाले की, बदलते हवामान, शेतीतील वाढता उत्पादन खर्च, बीटी कपाशीवरील कीडींचा प्रादूर्भाव आदींमुळे देशी कपाशी हा शेतकऱ्यांपुढे एक पर्याय उपलब्ध आहे. या केंद्राच्या माध्यमातून अमेकिरन कपाशीचे गुणधर्म देशी कपाशीत रुपांतरीत करण्याचे मुख्य कार्य करण्यात आले आहे. आज जागतिक बाजारपेठेत कपाशीच्या मागणीत विविधता असुन सर्जीकल कपाशी, रंगीत कपाशी, सेंद्रीय कपाशी या मागणीत देशी कपाशीचे वाण सुयोग्य ठरतात तसेच ते अमेरीकन कपाशीच्या तुलनेत समतुल्य आहेत. भविष्यात देशी कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, जनुकीय तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, जीआय मानांकन यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. एस. टी. बोरीकर यांनी या केंद्राने धाग्याच्या अधिक लांबीचे वाण प्रसारीत केले असुन त्यामुळे व्यावसायीक तत्वावरही कपाशीचे उत्पादन शेतकयांना फायदेशीर ठरेल असे मत व्यक्त केले तर डॉ. दत्तात्रय बापट यांनी कापुस उत्पादनक शेतकयांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी देशी कापूस लागवड तंत्रज्ञान भविष्यात निश्चितच उपयोगी ठरेल, अशी आशा व्यक्त केली. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, गेली शंभर वर्ष हे केंद्र कपाशी संशोधनात कार्यरत असून केंद्रातर्फे कपाशीचे दहा पेक्षाही अधिक वाण लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आले आहेत. यात नऊ सरळ वाण व एक संकरीत वाणाचा समावेश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात देशी कपाशीच्या लागवडी व संशोधनाचा आढावा घेणाऱ्या पुस्तीका व घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने देशी कपाशीपासुन तयार करण्यात आलेल्या कापडी पिशाव्यांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्राचे आजी व माजी प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ. अे. एच. राठोड, डॉ. एस. बी. बोरगावकर, तसेच देशी कापूस लागवड करणारे शेतकरी प्रगतशील शेतकरी श्री. स्वामीनाथन (चेन्नई, तमिळनाडु), श्री. वसंतराव फुटाने, श्री. नरेश शिंदे, श्री. बोले, आदींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक कापुस पैदासकार डॉ. खिजर बेग यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अरविंद पंडागळे यांनी केले तर आभार डॉ. विजयकुमार चिंचाणे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. डब्लु. एन. नारखेडे, डॉ. जी. के. लोंढे, डॉ. एस. पी. मेहेत्रे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. डी. एस. चौहान, डॉ. डी. एस. पेरके, डॉ. अविनाश राठोड, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे, श्री. बी.एच.कांबळे, श्री. अे. आर. पठाण, श्री. सदाशिव पांडे आदींनी परिश्रम घेतले.
Published on: 09 December 2019, 09:00 IST