देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागिराकांना मोठा फटका बसला. मजुरांच्या आणि कामगारांच्या हातातील कामे गेल्याने शहारातील मजुरांना परत आपल्या गावाची वाट पकडावी लागली. विविध राज्यातून मजूर वर्ग आपआपल्या गावात स्थालांतरित झाला. गावी परतलेल्या मजूरांना गावात काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती, याची दक्षता घेत मोदी सरकारने पीएम रोजगार योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
स्थालांतरित झालेल्या मजुरांमध्ये बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातीलच मजुर अधिक होते. यानुसार बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम रोजगार योजनेचा शुभारंभ केला. आपल्या राज्यात परतलेल्या नागरिकांना गावात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बिहारमधील नितीश कुमार सरकारने पुढकार घेतला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० जून रोजी श्रमिक कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटनही केले पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आले. कामगारांना १२५ दिवसांचे काम देण्याचे या योजनेत नमूद करण्यात आले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात या योजनेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. त्याच जिल्ह्यातील कामगारांच्या हाताला काम नाही.
द इंडियने एक्सप्रेसने पंतप्रधान रोजगार अभियानांतर्गत मिळणाऱ्या रोजगारासंदर्भात खडगिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील ३ गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली. हरिपूर, मेघौना आणि सहसी या गावात रोजगार अभियानांतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारासंबंधीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, हरिपूरमध्ये पावसामुळे काम बंद झाल्याचे दिसून आले, त्यामुळे १०० मजुरांवर बिकट परिस्थिती आली असून २० मजूर हे स्थालांतरीत आहेत. तर येथील मनरेगा अधिकारी रामकेबल पंडित पीएम गरीब कल्याण अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या रोजगाराची माहिती देऊ शकले नाही. दरम्यान गिद्ध गावातील परिस्थितीही वेगळी नाही, येथे वाड्याचे काम पूर्ण करण्यात आले, मात्र या कामातून केवळ ६ जणांना २० दिवसांचे काम मिळाल्याचे मनरेगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर मैघौना पंचायत विभागात अद्याप रोजगार उपलब्ध झालेला नाही. औलौली येथे २१ ग्रामपंचायत क्षेत्र असून त्यापैकी १० गावातही अद्याप या योजनेतून कामे देण्यात आली नाहीत.
Published on: 09 July 2020, 07:05 IST