चिखली-शासनाकडुन पिक विमा मंजुर होवुनही अद्यापर्यत पिक विमा रक्कम मिळाली नसल्याने ,तालुक्यातील शेतकरी यांनी कृषी विभागास सादर केलेल्या हजारो तक्रारींचा निपटारा करण्यात यावा. नदीकाठच्या शेतक-यांना तोकडी रक्कम दिल्याने उर्वरीत रक्कम खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे, आदींनी तालुका कृषी कार्यालय चिखली येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी प्रचंड कडाक्याच्या थंडीत शेतकरी कार्यालयासमोर ठाण मांडुन आहेत.तर दुसरीकडे, कृषी विभाग मात्र गाढ झोपेत असून, महिनाभर थांबा नंतर बघु. अशी भूमिका घेत ,कागदी घोडे नाचवत आहेत.शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा असतांना ,
त्याच्या हक्कापासून त्याला वंचित ठेऊन,बेजबाबदारपणाची उत्तरे कृषी विभागाकडुन मिळत असल्याने, शेतक-यांचा प्रशासना विरोधात प्रचंड रोष निर्माण होतांना दिसत आहे.
तालुक्यातील शेतक-यांचे अतिवृष्टिमुळे फार मोठे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.नदिकाठच्या शेत जमीनी पिकांसह खरडुन गेल्याने ; हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. असे असतांना शेतक-यांना दिलासा देण्याच्या दृष्टिने शासनाने जिल्ह्यासाठी पिक विमा देखील मंजुर करण्यात आला. परंतु यामधे पिक विमा कंपनीने मनमानी कारभार करीत स्वत:चे नियम,निकष लावत प्रधानमंत्री पिक विमा या योजनेपासुन शेतक-यांना वंचीत ठेवण्याचा घाट विमा कंपनीने घातल्याने , आजही तालुक्यातील अनेक शेतकरी विम्यापासुन वंचीत आहेत. वेळोवेळी केलेल्या मागण्यांची व तक्रारींची कृषी विभाग व विमा कंपनीकडुन दखल घेतली जात नसल्याने ,
आंदोलनाचे हत्यार नाईलाजाने ऊपसावे लागले. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन दि१३जानेवारी पासुन पिक विमा कंपनी विरोधात चिखली कृषी कार्यालयासमोर शेतक-यांसह बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आलीआहे.पिक विमा रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी,ज्या शेतक-यांना पिक विमा कमी दिला त्यांची उर्वरीत रक्कम जमा करण्यात यावी.नदीकाठच्या शेतक-यांना नुकसान झाले असतांना कमी रक्कम खात्यावर जमा केल्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करुन , उर्वरीत रक्कम तातडीने अदा करावी,दोन प्रकारच्या पिकांचा विमा काढला असतांना, केवळ तुर या पिकाचाच विमा जमा केल्याने इतर पिकाची विमा रक्कम अदा करावी. शेतक-यांच्या सर्व तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,यादीमध्ये पैसे पेड केल्याचे दाखविण्यात आले मात्र प्रत्यक्षात पैसे प्राप्त नसलेल्यांचे पैसे अदा करावे
या प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे.
यासह विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.परंतु या आंदोलनाचा पाचवा दिवस उलटुनही प्रशासनाकडुन कंपनी विरोधात ठोस पावले उचलण्यात आले नसल्याने, केवळ कागदी घोडे नाचवत वेळ मारून नेण्याचे काम कृषी विभाग करीत आहे.पिक विमा मिळण्यासाठी शेतक-यांना " तारीख पे तारीख " दिली जात असल्याने शेतकरी, कृषी विभाग व विमा कंपनी विरोधात रोष निर्माण करतांना दिसत आहेत.एव्हढे मात्र खरे.
प्रतिनिधि गोपाल उगले
Published on: 16 January 2022, 08:44 IST