सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची लागवड अंतिम टप्यांत आली आहे. १४ हजार ३५४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ६०३५ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे. मागील दोन वर्षांत दर समाधानकारक मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात कांदा लागवडी वाढत आहेत.
दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्याच्या इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढला. यातून मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. पाण्याची उपलब्धतेमुळे दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांत दोन पिके निघतील एवढे पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यामुळे कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
या वर्षी रब्बी हंगामात १४ हजार ३५४ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. कांद्याच्या क्षेत्रातील वाढीमुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याचे बी तसेच रोपांचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी रोपांना, बियाण्यांना मागणी चांगली राहिली आहे.
मान्सूनोत्तर पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातून कांदा पीक टिकवण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले आहे. सध्या कांदा लागवड वेगात सुरू आहे. १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. सध्या कांद्यास अपेक्षित दर आहेत.
Published on: 24 December 2021, 10:17 IST