महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात काकडीचे पीक घेतले जाते. ही एक वेलीवर्गीय वनस्पती आहे. काकडी हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येणारे आणि कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. सुधारीत जातींची लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचे नियंत्रण आणि तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचा वापर करून काकडी उत्पादन केल्यास काकडी लागवड फायद्याची होऊ शकते.
काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. काकडी ही सर्वांची आवडती फळभाजी असून तिचा उपयोग कोशिंबीर किंवा कच्ची खाण्यासाठी करतात. काकडीमध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम इत्यादी खनिजद्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात. तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.
जमीन -
काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते. काकडी लागवडीसाठी मातीचे पीएच 6-7 दरम्यान असावा.
खताचे प्रमाण -
अधिक उत्पादनासाठी पिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते देणे गरजेचे असते. हेक्टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत आणि 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश घ्यावे. शेणखत तसेच संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीपूर्वी द्यावे.
काकडीच्या सुधारित जाती:
हिमांगी -
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. फळांचे वजन 150 ते 200 ग्रॅमपर्यंत असते. काकडीमध्ये बियांचे प्रमाण कमी व गर जास्त असल्यामुळे चवीस उत्तम लागतात. या जातीपासून हेक्टरी 170 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.
शीतल वाण -
या जातीमध्ये बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे हिरवी व मध्यम रंगाची असतात. फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.
पुना खिरा - या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे आहेत. ही लवकर येणारी जात असून फळे आकारानी छोटी असतात. ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी
उत्पादन 13 ते 15 टन मिळते.
फुले शुभांगी -
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. ही जात प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात घेतली जाते. फळे आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. या जातीपासून हेक्टरी 180 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.
प्रिया -
ही संकरीत जात असून फळे गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.
पुसा संयोग -
ही लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते.
रोग व किडीचे नियंत्रण -
केवडा -
या रोगाच्या सूरुवातीला पानाच्या खालच्या बाजूस पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर पानाचे देठ व फांदीवरही त्याचा प्रसार होतो. दमट हवामानात हा रोग झपाट्याने पसरतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॉक्झिल एम-झेड 72, 0.25 टक्के किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 0.25 टक्के यांची दहा दिवसाच्या अंतराने लागवडीनंतर एक महिन्यांनी फवारणी करावी.
भुरी -
या रोगाची सुरूवात जुन्या पानांपासून होवून पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावरही पसरते. या रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप 0.1 टक्के किंवा ट्रायकोडर्मा 0.05 टक्के यांची फवारणी करावी.
कीडी -
फळमाशी -
या किडीच्या मॅलॅथिऑन 20 मिली, 100 ग्रॅम गुळ व दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
रस शोषणारी कीड -
या किडीच्या नियंत्रणासाठी मिथॉइल डिमेटॉन दहा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा इमिडॅक्लोरीड चार मिली किंवा थायामेथोक्झाम चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
Published on: 01 November 2023, 01:33 IST