आपण सध्या बाजारपेठेचा विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये हळूहळू सुधारणा होत असून मागील काही दिवसांपासून कवडीमोल दराने विकला जाणारा कांदा मात्र आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणेल अशी स्थिती आहे. कांद्याच्या बाजारभावामध्ये आता हळूहळू सुधारणा होत असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसून येत आहे. जर सध्या कांदा आवकेचा विचार केला तर सध्या कांद्याची आवक एकदम नगण्य असून त्यामागे बरीच कारणे आहेत.
नक्की वाचा:Potato-Tomato Price Hike: डाळींपाठोपाठ आता बटाटा आणि टोमॅटोही महागणार
सध्या नवीन कांदा अजून देखील बाजारपेठेत आला नाही आणि जो काही जुना कांदा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला होता तो देखील चाळींमध्ये बराच खराब झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम कांदा आवकेवर दिसून येत आहे. या कांदा दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कितपत मिळेल हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.
परंतु ज्या शेतकऱ्यांकडे थोडा बहुत प्रमाणात कांदा शिल्लक आहे, त्यांना तरी समाधान लाभेल अशी स्थिती सध्या आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तिसगाव उपबाजार आवारातील झालेल्या कांदा लिलावाचा विचार केला तर या ठिकाणी कांद्याला उच्चांक असा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये थोडासा दिलासा मिळताना दिसून येत आहे.
कांद्याला मिळाला साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिसगाव बाजार आवारामध्ये आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असेल तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात.
काल शुक्रवारी कांद्याचा लिलाव झाला व त्यामध्ये अडीच हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. यामध्ये झालेल्या लिलावात सुपर दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये असा बाजार भाव मिळाला. जर आपण कालची तिसगाव उपबाजार आवारातील कांद्याच्या दराची स्थिती पाहिली कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
या सोबतच आज राज्यातील अमरावती बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याचे आवक झाली व झालेल्या लिलावामध्ये किमान 1600 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 3600 रुपये प्रतिक्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला.
अमरावती बाजार समितीतील कांद्याच्या दरातील सरासरी पाहिली तर ती 2600 रुपये इतकी होती. आता कांद्याचे बाजार भाव मध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे परंतु भविष्यकाळात स्थिती काय राहील याबद्दल आज तरी सांगणे कठीण आहे.
Published on: 29 October 2022, 07:51 IST