सध्या रब्बी हंगाम ऐन जोमात असताना खतांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडवणूक करून बरेच खत विक्रेतेजास्त दराने खताची विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत काही तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर कृषी विभाग ऍक्टिव्हमोडवर आला आहे. त्याचाच भाग म्हणून जास्त दराने खते विक्री करणाऱ्या सात विक्रेत्यांवर खत विक्री परवाना निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिली.
अगोदरच खतांच्या टंचाईमुळे पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकरी समस्येत आहे त्यातच आवंटन मंजूर झाल्या नुसार विक्रेत्यांकडे जो खत साठा उपलब्ध होतो त्याची शेतकरी मागणी होत असताना काही विक्रेते जास्त दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रकारसमोर येत आहे.
काही खत विक्रेते शेतकऱ्यांना कच्ची बिले देऊन मनमानी कारभार करीत असून त्यामुळेगुणवत्ता व नियंत्रण विभाग सावध झाला आहे. याबाबतीत कृषी विभागाच्या पथकाने स्वतः ग्राहक बनून जात याबाबत शहानिशा केली असता हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले व ते सिद्ध झाले. यावर कृषी विभागाने केलेल्या कारवाईच्या आधारे सटाणा,येवला आणि निफाड तालुक्यातील सात खत विक्रेत्यांवर कारवाई करत परवाने निलंबित केले आहेत.
शेतकरी देखील सावध राहावे
शेतकऱ्यांना देखील खत खरेदी करताना होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी दुकानदारांकडून पक्के बिले घ्यावीत सोबतच विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना रास्त दरात खतेविकून सहकार्य करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Published on: 21 January 2022, 09:14 IST