नाशिक जिल्ह्यातील 1054 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड देऊन गौरवण्यात येणार आहे कारण पाण्याची गुणवत्ता अबाधीत ठेवणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. सलग पाच वेळा हिरवे कार्ड मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीला तालुका स्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये चंदेरी कार्डचे वाटप केले जाणार असून नाशिक पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या हस्ते गुरुवारी प्रातिनिधिक स्वरूपात ही कार्ड प्रदान करण्यात आली.
नेमक्या कोणत्या बाबीत देण्यात येते हे चंदेरी कार्ड?
नागरिकांना शुद्ध व स्वच्छ तसेच सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा तसेच पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग व पाणी व स्वच्छता विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने अंमलबजावणी केली जाते.त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 1386 पैकी 1054 ग्रामपंचायतींनी या चंदेरी कार्ड चे असलेले निकष पूर्ण केले असून त्यांना तालुकास्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये चंदेरी कार्डचे वितरण करण्यात येत आहे. या गावांमध्ये तीन वर्षांपासून सातत्याने जून महिन्यामध्ये सर्व जलकुंभांची स्वच्छता करण्यात येत आहे.
याबाबतीत नाशिक पंचायत समितीत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये तालुक्यातील चंदेरी कार्ड प्राप्त 40 पात्र ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या शासकीय योजनेचे निकष
- वर्षातून जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे आरोग्य विभागामार्फत दोनदा सर्वेक्षण करण्यात येते.
- यामध्ये स्त्रोतांचे व्यवस्थापनामध्ये जे दोष आढळून येतात त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीसप्रतिबंध करता येतो. या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त निकषानुसार ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे, लाल व चंदेरी कार्ड वितरित करण्यात येते.
- सलग पाच वर्ष ज्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड मिळाले आहे व पाच वर्ष संबंधित गावांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या साथीच्या उद्रेक झाला नसेल अशा ग्रामपंचायतींना जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त सहीने चंदेरी प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो.
- यामध्ये ग्राम विकास अधिकारी,ग्रामसेवक व आरोग्य सेवक तसेच जलसुरक्षक यांना चंदेरी कार्डचे वितरण करण्यात येते.
Published on: 04 February 2022, 02:40 IST