यंदा मॉन्सून हा समान्य असल्याने शेतीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. या बैठकीत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्रात १५७ लाख हेक्टर खरिपाची शेती असल्याची माहिती दिली.
खरिपात कापूस ४३ लाख हेक्टर, सोयाबीन ४३.५० लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, मका ८.८४ हेक्टर, कडधान्याचे क्षेत्र २३ लाख हेक्टर आणि उस ९.५० लाख हेक्टर आहे. खरिप हंगामासाठी सर्व प्रकारची मिळून ६३.६४ लाख मे. टन रासायनिक खते व १८.२६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच २०२१-२२साठी युरियाचा दीड लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन आहे. सध्या ३० हजार मे. टन युरिया आहे; असेही कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे यांचा तुटवडा जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
सोयाबीनचे २९ लाख क्विंटल स्वतःचे बियाणे उपलब्ध झाले आहे. कापूस पिकाकरिता २ कोटी २२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन करण्यात आले आहे. आणखी १ कोटी ७१ लाख बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे; असे कृषीमंत्री म्हणाले.या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी सभापती, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते.
महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळतील बियाणे
महाडीबीटी पोर्टलची रचनाही अनेक प्रकारच्या योजनांसाठी एका ठिकाणी आणि एकच अर्ज करता यावे यासाठी केली गेली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे योजना या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्याच अनुषंगाने आता राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये बियाण्यांचा देखील समावेश केला आहे. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी येत्या १५ मेपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल असे कृषी आयुक्तालयने म्हटले आहे. याअंतर्गत तूर, मुग, उडीद,, मका, बाजरी, भात इत्यादी बियाणे हे अनुदानावर मिळू शकतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ही सुविधा मिळणार आहे, असे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: 22 May 2021, 08:02 IST