फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियाना मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये कारवाईला सुरुवात झाली असून औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक यांनी जलयुक्त शिवार घोटाळ्यातील अधिकारी आणि संस्था यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
या घोटाळ्यासंदर्भात परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर अगोदरच कारवाई झालेले असून त्यांना संबंधित रक्कम तातडीने भरण्यासाठी नोटीस देखील बजावण्यात आली आहेत. याबाबतीत काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मागच्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.जलयुक्त च्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली होती.
याप्रकरणी आतापर्यंत 30 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या घोटाळ्या मागील आरोपींवर गुन्हे दाखल करून संबंधितांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले असताना देखील आरोपींना अटक का होत नाही? असा प्रश्न काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी पाच पथकामार्फत करण्यात आली होती या संबंधित पथकाने झालेल्या कामांमधून 15 टक्के कामाची निवड संबंधीत तपासासाठी केली होती.
एकूण 815 कामांपैकी 123 कामे निवडण्यात आली होती. त्यापैकी 103 कामांची तपासणी होऊन त्यामध्ये 95 कामांमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले होते.
Published on: 17 February 2022, 09:44 IST