भारतात बऱ्याच भागात केळीची लागवड केली जाते, महाराष्ट्रात देखील केळीचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील खांदेश प्रांत केळीच्या उत्पादणासाठी जगात विख्यात आहे, येथील जळगावं जिल्ह्याला केळीचे आगार म्हणुन संबोधले जाते. एवढेच नाही तर जळगाव जिल्ह्यातील केळीला जिआय टॅग देखील देण्यात आला आहे.
यावरून खांदेश प्रांतचे केळीच्या उत्पादनातील स्थान आपल्या लक्षात आलेच असेल, पण जर आम्ही आपणांस सांगितलं की, मराठवाडयात देखील आता केळीच्या बागा बहरत आहेत तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही? पण मराठवाड्यात देखील आता केळीच्या बागा लावल्या जात आहेत आणि त्यातून यशस्वी उत्पादन देखील शेतकरी बांधव प्राप्त करत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली शिवारात जवळपास 35 एकर क्षेत्रात केळीच्या बागा लावल्या गेल्या आहेत. आणि या क्षेत्रातील केळी आता बाजारात हजेरी लावताना दिसत आहेत, या केळीना अगदी खान्देशच्या केळीप्रमाणे चव असल्याचे सांगितलं जात आहे. मराठवाड्यात केळीचे उत्पादन घेणे तसे मुश्किलीचेच काम आहे, पण औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावातील शेतकऱ्यांनी केळीची लागवड करून एक जिकरीचे काम केले आणि केळीचे यशस्वी उत्पादन घेऊन एक नवीन प्रयोग यशस्वी करून दाखविला.
एकरी होतेय लाखोंची कमाई
गांधेली हे गाव पुणे-धुळे या एक्सप्रेसवे वर असल्यामुळे या गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना केळी पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. गांधेलीच्या केळी हि दिसायला आणि चवीला अगदी खान्देशच्या केळी सारखीच असल्याने याची मागणी हि चांगली आहे. येथील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून केळी पिकातून जवळपास एकरी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न पदरी पाडले आहे.
गांधेलीची केळी पण खांदेशच्या नावावर होतेय विक्री
औरंगाबाद बाजारपेठेत गांधेलीच्या केळीनी हजेरी लावली आहे. ह्या केळी चवीला खान्देशच्या केळीसारख्या असल्याने लोक ह्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि याचा फायदा गांधेलीच्या शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे त्यांना अधिकचा दर मिळत आहे, शिवाय कच्च्या केळीला देखील चांगले मोठे मार्केट प्राप्त होत आहे. गांधेली गावातील केळी उत्पादक शेतकरी सांगत आहेत की, गांधेलीच्या केळीला खांदेशच्या केळीसारखा एक ब्रँड बनवायचा आहे, आणि यासाठी केळीच्या क्वालिटीवर विशेष भर दिला जात आहे.
Published on: 12 December 2021, 12:07 IST