News

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरुप लाभले आहे.

Updated on 23 August, 2019 8:10 AM IST


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरुप लाभले आहे. शेती व्यवसाय करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली. दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार शासनाने नियुक्त केलेली विमा कंपनी 2 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते.

प्रचलित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब विमाछत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वहितीधारक शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठीदेखील लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये वहितीधारक म्हणून नोंद नसलेले कोणतेही 1 सदस्य म्हणून शेतकऱ्याचे आई-वडील, पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यासह कुटुंबातील एक सदस्य अशा 2 जणांना या योजनेतून विमाछत्र लाभणार आहे.

ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातील कोणताही 1 सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत. विमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन विमा कंपनीकडे भरणार आहे. त्यामुळे शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्त‍ीने किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही.

English Summary: Improvement in Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme
Published on: 23 August 2019, 08:03 IST