महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडी हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येते. काकडीच हे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. काकडीची चव व त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन असल्यामुळे वर्षभर काकडीला बाजारात मोठी मागणी असते. काकडीमध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम इत्यादी खनिजद्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात. खालील सुधारीत जातींची लागवड करून काकडी उत्पादन केल्यास काकडी लागवड फायद्याची होऊ शकते.
हिमांगी -
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. फळांचे वजन 150 ते 200 ग्रॅमपर्यंत असते. काकडीमध्ये बियांचे प्रमाण कमी व गर जास्त असल्यामुळे चवीस उत्तम लागतात. या जातीपासून हेक्टरी 170 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.
शीतल वाण -
या जातीमध्ये बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे हिरवी व मध्यम रंगाची असतात. फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.
प्रिया -
ही संकरीत जात असून फळे गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते.
पुना खिरा - या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे आहेत. ही लवकर येणारी जात असून फळे आकारानी छोटी असतात. ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन 13 ते 15 टन मिळते.
फुले शुभांगी -
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केली आहे. ही जात प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात घेतली जाते. फळे आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. या जातीपासून हेक्टरी 180 ते 190 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा संयोग -
ही लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते.
Published on: 04 December 2023, 04:10 IST