मुंबई
मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरुपाची पोलीस भरती होणार असे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्या वृत्तावर गृहविभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. पोलीस दलात कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची भरती होत नाही, केली जात नाही अशी माहिती गृहविभागाने दिली आहे.
मुंबईत सध्या कमी पोलीस मनुष्यबळ आहे. त्यामुळे कंत्राटी स्वरुपात भरती होणार असे वृत्त प्रकाशित झाले होते. तर त्या वृत्ताचे गृहविभागाने खंडण केले आहे. तसंच मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्य सुरक्षा महामंडळाचे ३ हजार मनुष्यबळ तूर्तास वापरणार आहे, अशी माहिती गृहविभागाने दिली आहे.
गेल्या काळात पोलीस भरती न झाल्याने आणि गेल्या पोलीस आयुक्तांनी सुमारे ४ हजार ५०० पोलीस जिल्हा बदल्यांसाठी सोडल्याने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. पोलीस शिपायांची सुमारे १० हजार पदे रिक्त आहेत. दरम्यान, गृहविभाग कंत्राटी पोलीस करणार या वृत्ताचे गृहविभागाने खंडण केले असून ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.
पोलीस भरतीबाबत आमदार रोहीत पवारांचं ट्विट
राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं. त्याप्रमाणेच कंत्राटी पोलिस भरती करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते.लाखो युवा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध!, असं ट्विट रोहीत पवारांनी केलं आहे.
Published on: 25 July 2023, 03:06 IST