News

नागरिकांचे हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करा, अशा सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण होणे आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचे वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

Updated on 28 March, 2025 10:52 AM IST

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेने भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे – शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.

नागरिकांचे हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करा, अशा सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण होणे आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचे वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आवश्यक असणारे अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांना त्यांनी बैठकीतूनच फोनद्वारे दिल्या.

पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करा. शक्य असल्यास घाटाचे बांधकाम आरसीसी मध्ये करा, जेणेकरुन नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवा. तसेच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतींचा बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करा, असे त्यांनी सांगितले. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवा, अशा सूचना देऊन आरोग्य, शिक्षण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्या त्या विभागांच्या सचिवांशी बैठकी मधूनच फोनवर बोलून संबंधित प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही करुन मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण व्हावे. पंचगंगा नदी बारमाही प्रवाहित ठेवावी, जेणेकरुन हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासणार नाही तसेच नदी प्रदूषणही रोखले जाईल. तसेच अमृत योजनेअंतर्गत मोठ्या तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच कट्टी मुळा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनना साठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मेळावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेतील कामांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

English Summary: Implement development plans with a view to 25 years into the future Notice to Ajit Pawar's administration
Published on: 28 March 2025, 10:52 IST