मुंबई: कृषी विभाग अधिकाधिक शेतकरीभिमुख करतानाच बियाणे, कीटकनाशके, खते याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. भुसे बोलत होते. खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या बाबतील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी सूचना श्री. भुसे यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांचा पुरवठा झाल्यास त्यांना कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याबाबत कायद्याचे प्रारूप तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कंपन्यांनी विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दिलेली कीटकनाशके किंवा खते कालबाह्य झाल्यास ती कोणत्या पद्धतीने नष्ट केली जावीत, यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याबाबतच्या सूचनादेखील श्री. भुसे यांनी केल्या. तसेच बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्रेत्यांसाठी पात्रतेच्या उपलब्ध निकषांचा आढावा घेतला आणि त्यात आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. अशा विक्रेत्यांनी विक्रीदरम्यान शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बियाणे गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रचलित कायदे, बियाणे पुरवठा संस्था, अधिसूचित संशोधित बियाणे, बियाणे अधिनियम, बियाणे विक्री परवाना, बियाणे विक्री परवानासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, कीटकनाशक कायदा 1968 व कीटकनाशक नियम1971 मधील तरतुदी एचटीबीटी कापूस बियाणे, बियाण्यासंदर्भात न्यायालयीन निकालांचे तपशील, आतापर्यंतच्या दाखल झालेल्या तक्रारींचा आढावा, कापूस बियाणे, बियाणे तक्रारीविषयी करण्यात येत असलेली कारवाई इत्यादी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण संचालक विजय घावटे आदी उपस्थित होते.
Published on: 07 March 2020, 10:29 IST