News

शिर्डी: निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याच्या विविध भागात घरांचे, वीज वितरण व्यवस्था आणि शेतीचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक भागात शेती पिकांसह झालेल्या विविध नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Updated on 07 June, 2020 7:31 AM IST


शिर्डी:
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याच्या विविध भागात घरांचे, वीज वितरण व्यवस्था आणि शेतीचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक भागात शेती पिकांसह झालेल्या विविध नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा, तांगडी, पाणसवाडी यासह पठार भागातील विविध गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार डॉ. किरण लहामटे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर आदींसह महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, राज्यात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट राज्यावर आले होते. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर शासन व प्रशासनाने राज्यात सर्वत्र आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवली होती. कोकण किनारपट्टीवर या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्ये उभ्या पिकांचे तसेच इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास चक्रीवादळाने हिसकावून घेतला आहे. शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

याचबरोबर या वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला असून तोही तातडीने सुरळीत करावा. या वादळामुळे नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहील, असे सांगून राज्यातील विविध भागात निसर्गचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक शेतकऱ्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपल्या व्यथा यावेळी मांडल्या. या सर्वांच्या समस्या त्यांनी आत्मियतेने जाणून घेतल्या आणि तातडीने पंचनामे व मदत करण्याची सूचना प्रशासनाला केली. मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

English Summary: Immediately inquire panchanama into the damage caused by the cyclone
Published on: 07 June 2020, 07:25 IST