जर तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना केवायसी (KYC)माहिती अपडेट करणे अनिवार्य केले आहे.
बॅंकेने कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक ठिकाणी लागू झालेल्या लॉकडाऊनला लक्षात घेऊन पोस्ट किंवा मेलद्वारे केवायसीची माहिती किंवा कागदपत्रे जमा करण्यास आपल्या ग्राहकांना परवानगी दिली आहे. केवायसी माहिती अपडेट न केल्यास ३१ मे पर्यत ग्राहकांचे खाते चालू राहील मात्र ३१ मे नंतर बॅंकेतील खाते अंशत: बंद होईल. असे झाल्यास जोपर्यत ग्राहक केवायसी कागदपत्रे जमा करत नाहीत तोपर्यत बॅंकेतील खात्यामधून पैसे काढू शकणार नाहीत.
केवायसी केव्हा करावी लागते
केवायसी अपडेट, हाय रिस्क ग्राहकांसाठी किमान दोन वर्षातून एकदा, मध्यम जोखीम असणाऱ्या ग्राहकांसाठी ८ वर्षांतून एकदा आणि अतिशय कमी जोखीम असणाऱ्या ग्राहकांसाठी १० वर्षांतून एकदा करावे लागते.
केवायसी केले नाही तर काय होईल
केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमच्या खात्यात भविष्यात करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर निर्बंध लागू शकतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा निर्बंधांना लक्षात घेऊन बॅंकेच्या शाखेत पोस्टद्वारेदेखील कागदपत्रे पाठवून केवायसी अपडेट केले जाऊ शकते.
एसबीआय केवायसी अपडेशनसाठीची कागदपत्रे
स्टेट बॅंकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केवायसीसाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असली पाहिजेत-
पासपोर्ट
मतदान ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
आधार कार्ड
नरेगा कार्ड
पॅन कार्ड
केवायसी का महत्त्वाचे आहे
केवायसीद्वारे बॅंक आपल्या ग्राहकाबद्दलची माहिती गोळा करते. यामुळे ग्राहकाला व्हेरिफाय करता येते. ग्राहकाच्या व्यवहारांमध्ये काही गडबड तर नाही ना हे जाणण्याचा बॅंकेचा प्रयत्न असतो.बेकायदेशीर किंवा आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केवायसी प्रक्रिया आणण्यात आली आहे. याद्वारे आर्थिक व्यवहारांचे नियम करताना ग्राहकांविषयी माहिती जाणून घेऊन ग्राहकांविषयीची खातरजमा बॅंकांना करता येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉलकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन बॅंकांनी ऑनलाईन सुविधा आणि ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात देशातील अनेक सेवा डिजिटल व्यासपीठावर भर देत आहेत. ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत घरबसल्या कामे करण्यावर भर देण्यात येतो आहे. त्यामुळे निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये न जाता ग्राहकांना आपली कामे करता येत आहेत. शिवाय बॅंकांनाही आपले व्यवहार सुरळीत ठेवता येता आहेत. मोबाईल बॅंकिंगचाही मोठा वापर केला जातो आहे. बहुतांश बॅंकांनी आणि वित्तीय संस्थांनी आपले मोबाईल अॅप आणले आहे. मोबाईल अॅपमुळे आपल्या स्मार्टफोनचा वापर करून घरबसल्याच बॅंकिंगची कामे करता येणे सोपे झाले आहे. डिजिटल व्यासपीठांना प्रोत्साहन देण्याचेच सरकारचे धोरण आहे.
Published on: 04 May 2021, 06:24 IST