द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) यावर्षी चांगलाच संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ या अस्मानी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात.
द्राक्ष उत्पादक संघानी (Grape Growers Association) द्राक्ष दराबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादक संघाने द्राक्षच्या वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. याची सुरवात नाशिक येथे झाली असून आता विभागनिहाय हा निर्णय होत आहे. द्राक्ष आणि बेदाण्याचे दर हे 10 टक्के इतक्या झालेल्या खर्चावर नफा ठेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान झालेला खर्च निघून चार पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यापूर्वी नाशिक, सांगली या ठिकाणी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर ठरलेले आहेत. आता सोलापूर विभागातील (Solapur Division), उस्मानाबाद, पंढरपूसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंढरपूर येथे बैठक पार पडली.
द्राक्ष दर असे असणार
द्राक्षाचे दर हे वाणानुसार ठरविण्यात आले आहेत. यामध्ये थॉमसन (Thomson) 35 रुपये किलो, माणिक चमन (Manik Chaman) 40 रुपये, सुपर सोनका 50, तर आर.के.एस.एस एन आणि आनुष्का वाणाचे द्राक्ष हे 55 रुपये किलोने विक्री करण्याचा निर्णय झाला आहे. चांगल्या प्रतीचे बेदाणे (Raisins) 200 त्यापेक्षा हलक्या प्रतीचे 150 तर सर्वात कमी म्हणजे 100 रुपये प्रति किलोने विकावे असा निर्णय घेण्यात आला आहे.
द्राक्ष दराबाबत पहिल्यांदाच झाला निर्णय
यंदा प्रथमच हा प्रयोग नाशिक संघानेन राबवला होता. त्यानंतर सांगली आणि आता सोलापूर विभागाने हा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. द्राक्ष छाटणीला आले की व्यापारी वाटेल त्या किंमतीने मागणी करतात. शिवाय शेतकरीही वेगवेगळे दर ठरवून देतात. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नच शेतकऱ्यांना मिळत नव्हते. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार म्हणाले (Shivajirao Pawar, President of Grape Growers Association), सोलापूर द्राक्ष उत्पादक संघामध्ये उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे हा निर्णय तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. सर्वानुमते निर्णय झाला असल्याने यामध्ये शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर बदल केला तर संघाच्या भूमिकेला अर्थ राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने दराबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले आहे.
Published on: 12 January 2022, 06:31 IST