News

आरोग्य सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.

Updated on 13 October, 2023 6:18 PM IST

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला. सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्यावा; या संदर्भात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिला आहे.

बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले, आरोग्य सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. येत्या मार्चअखेरपर्यंत दोन्ही महापालिका क्षेत्रात खाटांची संख्या वाढवावी. ससून रुग्णालयात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ झालाच पाहिजे. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवावीत. बाह्य स्रोताद्वारे वर्ग-४ पदे त्वरित भरण्यात यावी. शहरी भागात आयुष्मान कार्ड वितरणाच्या नोंदणीला गती द्यावी आणि जिल्हा राज्यात प्रथम राहील असे प्रयत्न करावे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित राहतील यावर लक्ष द्यावे. शासकीय रुग्णालयात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.ठाकूर यांनी ससून रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. रुग्णालयातील उपचार सुविधेत वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.येमपल्ले आणि डॉ.हंकारे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची माहिती दिली.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान गांभीर्याने राबवा
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात यावे आणि कार्यालये स्वच्छ व सुंदर दिसतील यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.

ते म्हणाले, या अभियानात अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील स्वच्छ कार्यालयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

English Summary: If general patients are neglected, strict action will be taken against those concerned ajit pawar news
Published on: 13 October 2023, 05:30 IST