बुलढाणा
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच कायम करणार असल्याची भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. मी आमुक पक्षात जाणार तमुक पक्षात जाणार, अशी जी अफवा आहे ती थांबवावी, अशी विनंतीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.
यावेळी तुपकर म्हणाले की, मला संघटनेत राहूनच शेतकरी चळवळीचं काम करायच आहे. माझ्या दृष्टीने शेतकरी हा माझा आत्मा आहे. तसंच शेतकरी हा माझा प्राण असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचं आहे, हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि मी आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, "माझे जे काही आक्षेप आहेत किंवा जी काही नाराजी आहे. कार्यकर्त्यांचं जे काय दुखणं आहे. ते सगळं मी मांडलेलं आहे. तसंच आमची नाराजी ही माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. संघटनेच्या हितासाठीच आहे. चळवळीच्या हितासाठीच आहे. तर महाराष्ट्रभर चळवळ कशी वाढेल या दृष्टीनेच आहे. याबाबतचे विषय मी राजू शेट्टी यांना बोललो आहे."
"मागील पाच वर्षापासून सुरू ज्या काही समस्या आहेत. त्याबाबत मी बोललो आहे. त्यामुळे राजू शेट्टींचा जो काही सकारात्मक निर्णय असेल किंवा जी काही अंमलबजावणी असेल ती त्यांनी करायची आहे. तसंच आमच्या सोबत काम करणारे बाकीचे वरिष्ठ आहेत त्यांनाही याबाबत बोललो आहे."
"मला संघटनेत राहूनच चळवळीच काम करायच आहे आणि ते मला नेतृत्वाने करू द्यावं. प्रामाणिकपणे अशी माझी इच्छा आहे. असंही मी त्या दिवशी बैठकीत सांगितले आहे. आजही सांगतो की स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यामध्ये महाराष्ट्रातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचे योगदान आहे. अनेकांनी पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ला आहेत. अनेक जण तुरुंगात गेलेले आहेत."
तुपकर नाराज असल्याची रंगली होती चर्चा
शेतकरी नेते रविकांत तुपकर पक्षात नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. तसंच त्यांची नाराजी लक्षात घेऊन त्यांना भाजपकडून देखील खुली ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यावर तुपकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे तुपकर यांनी त्यांची भूमिका मांडून रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Published on: 08 August 2023, 01:11 IST