काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं तडाखा दिला आहे. तर काही ठिकाणी जोरदार गारपिटही झाली. आता येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात १५ मे रोजीच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता राज्यासमोर नवं संकट निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. तर यामुळे १४ मे रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उद्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
इतकंच नाही तर या राज्यांतील सर्व मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी इशारे देण्यात आले असून पुढचे काही दिवस समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा मान्सूनवर काही परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Published on: 11 May 2021, 10:10 IST