News

कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती मिळते तसेच शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन आणि ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभव त्यांना घेता येतो.

Updated on 13 May, 2022 10:26 AM IST

16 मे आंतरराष्ट्रीय 'कृषी पर्यटन दिन' (Agri-Tourism Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) वतीने काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमात विशेष पुरस्कार सोहळा देखील घेतला जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण पद्धती वापरुन यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना आणि कल्पनांना सन्मानित केले जाणार आहे. करिअरच्या दृष्टीने 'कृषी पर्यटन विकास' हेदेखील चांगले क्षेत्र ठरु शकते म्हणूनच, या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मार्गदर्शक पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने तसेच वेगाने विकसित होणाऱ्या या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ज्यांची माहिती करुन घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावं, असं आवाहन पर्यटन विभाग व एटीडीसीने केले आहे.

Weather Update : पाच दिवस अगोदरच दाखल होणार मोसमी पाऊस; IMD चा अंदाज

या कार्यक्रमासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच कृषी पर्यटन विकास महामंडळाचे संस्थापक पांडुरंग तावरे यांच्यासह सर्व विभागातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.


कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती मिळते तसेच शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन आणि ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभव त्यांना घेता येतो. तसेच शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची त्यांना संधी मिळते. निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळते. 2020 मध्ये या धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली.

 

मात्र यंदा परिस्थिती सुधारल्याने तसेच उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्यामुळे, प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाद्वारे अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन प्रधान सचिव, श्रीमती वल्सा नायर सिंग यांनी दिली.

कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे असे वक्तव्य महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील. गावांचा शाश्वत विकास होईल. 6 प्रादेशिक उपसंचालक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून संबंधित विभागात कृषी पर्यटन क्षेत्राची व्याप्ती आणि संधी समजावून सांगतील, अशी माहितीही मिलिंद बोरीकर यांनी दिली.


कृषी पर्यटन विकास महामंडळाचे संस्थापक पांडुरंग तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. हे धोरण राबवल्यापासून शेतकऱ्यांच्या रोजगारात 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कृषी पर्यटन केंद्रांवर 2018, 2019 आणि 2020 साली अनुक्रमे 4.7 लाख, 5.3 लाख आणि 7.9 लाख पर्यटक भेट देऊन गेले.


यामुळे शेतकऱ्यांना बराच फायदा झाला. शेतकऱ्यांना जवळजवळ 55.79 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. एवढंच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील एक लाख महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनावर नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.

महत्वाच्या बातम्या:
मोसमी पाऊस(वारे)15 मे रोजी अंदमानात,20 ते 26 मे केरळ आणि 27 ते 2 जून तळकोकणात करणार एन्ट्री- आयएमडी
जमिनीविषयी शासन निर्णय! आता जिरायती जमीन कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन 10 गुंठे करता येणार खरेदी

English Summary: Honor of Bali Raja ..! Organizing programs on behalf of Maharashtra Tourism and Agri-Tourism Development Corporation
Published on: 13 May 2022, 10:26 IST