News

मुंबई: आपल्या समाजातील स्त्री शक्ती हीच आपली राष्ट्रशक्ती आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी, राज्याच्या पर्यायाने देशाच्या विकासात सहभाग देण्यासाठी आता कौशल्य विकास विभागाने व्यासपीठ देण्याचे ठरविले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी 'हिरकणी महाराष्ट्राची' ही स्पर्धा आता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत घेतली जाणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

Updated on 08 February, 2019 8:06 AM IST


मुंबई:
आपल्या समाजातील स्त्री शक्ती हीच आपली राष्ट्रशक्ती आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी, राज्याच्या पर्यायाने देशाच्या विकासात सहभाग देण्यासाठी आता कौशल्य विकास विभागाने व्यासपीठ देण्याचे ठरविले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी 'हिरकणी महाराष्ट्राची' ही स्पर्धा आता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत घेतली जाणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

श्री. निलंगेकर म्हणाले, ज्यावेळी देशात 50 टक्के महिला या उद्योजक होतील तेव्हा भारत हा जगात क्रमांक एकचा देश बनेल. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करण्याची गरज असून यासाठी कौशल्य विकास विभाग पुढाकार घेत आहे. हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

हिरकणी हे नाव का ?

हिरकणी महाराष्ट्राची असे आगळेवेगळे नाव देण्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. हिरकणी हे नाव सर्वांना माहित आहे. रायगडावर दूध घालणारी गवळण हिरकण होती. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर माझ्या लेकराचं कसं होईल या भीतीने रात्रीच्या बुरुजावरुन उतरली आणि तिचा हा असामान्य पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या बुरुजाला हिरकणीचे नाव दिले. येणाऱ्या काळात हिरकणी हे ब्रँडनेम करण्यासाठी सिम्बॉल मागविण्यात येणार आहे. जे सिम्बॉल उत्कृष्ट असेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धा लवकरच घेतली जाणार असून, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्याची पायलट जिल्ह्ये म्हणून निवड करण्यात आली आहे.

काय आहे हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धा...

पहिल्या टप्प्यात महिलांना अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत. स्टार्ट अप क्वॉलिटीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात याबाबत प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यानंतर हा प्लॅन सादर करण्यासाठी 100 बचतगटांना 3 हजार रुपये दिले जाणार आहेत. 25हजार रुपये प्रत्येक खात्यावर पहिल्या 10 बचत गटांना देण्यात येणार असून, असे जिल्ह्यातील 100 बचत गटांना पैसे दिले जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरील10 बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. सक्षम महिलाशक्ती मध्येच देशाच्या विकासाचे बीज आहे. राज्याच्या लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांच्या आयुष्यात विविध योजनांमुळे आनंद निर्माण होणार आहे.

कौशल्य विकासातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील टक्केवारी येणाऱ्या काळात 50टक्क्यांपर्यंत नेण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. हिरकणी महाराष्ट्राची या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना कौशल्य प्रशिक्षणातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रत्येक तालुका जिल्हास्तरावर हिरकणी कॅम्पचे आयोजन करुन महिला उद्योजक, बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एका हिरकणीची तर निवडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या हिरकणींमधून राज्यस्तरीय हिरकणीची निवड करण्यात येईल.

महिलांच्या विचारातील नव्या व्यवसाय निर्मितीसाठी हिरकणी महाराष्ट्राची ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची नवी संधी निर्माण करून तालुका ठिकाणी हिरकणी कॅम्प घेऊन जिल्हानिहाय हिरकणीची निवड करण्यात येणार आहे. यातून राज्य पातळीवर हिरकणी निवडून तिचा सन्मान केला जाणार आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे.

महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ- संभाजी पाटील-निलंगेकर

जागतिक पातळीवर महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पनाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न 'हिरकणी महाराष्ट्राची' मधून करण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर येथून होणार आहे. आरोग्य सुविधा,शेती, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, संतुलित विकास आणि पर्यावरण अशी क्षेत्रे हिरकणी महाराष्ट्राची स्पर्धेसाठी निवडण्यात आली असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

English Summary: Hirakani Maharashtrachi Competition will be organized for the women's financial independence
Published on: 08 February 2019, 08:03 IST