अतिृवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. देशोधडीला लागेला शेतकरी आजही शासनाकडून मदतीची वाट बघत आहे. पण संवेदनहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वा-यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरीविरोधी सरकारचा काल निषेध व्यक्त केला आहे.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज जालन्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी शेतकरीविरोधी सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यातील भीषण वास्तव मांडताना दरेकर यांनी सांगितले की, ज्याप्रकारे शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यावर सरकारने गतीने यावर उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही.
मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभूतपूर्व पाऊस पडला आहे. एकीकडे धरणे भरली आहेत त्याचा आनंद होत आहे.पण दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याचे दुःख बघायला मिळत आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. साधारण ३ लाख ८९ हजार शेतकरी बांधव नुकसानग्रस्त झाले आहेत. सरकारी आकड्यांमध्ये ही संख्या तीन लाखावर आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मोसंबी, तुर पिकांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जून,जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर चार महिने झाले तरी पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की सरसकट पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करा. भाजपच्या वतीने जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीक विम्यांचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे अशा तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.फुलंब्री, कन्नड या ठिकाणी ९० टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरले, परंतु त्यांना विम्याचे पैसे नाही मिळाले. जालना मधील बदनापुर, रोशनगाव मधील शेतकऱ्यांनाही विम्याचे पैसे मिळाले नाहीत. असा भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे. विमा कंपनी म्हणते शासनाकडून जे पंचनामे केले जातील ते आम्ही ग्राह्य धरणार नाही. आमची माणस प्रत्यक्षपणे तिथे जाऊन तपासणी करतील आणि त्यानंतर रक्कम ठरवली जाईल. म्हणजे अजून सहा महिने आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवण्याकरता वाट बघावी लागेल.
विमा कंपन्यांकडे यंत्रणा नाही, माणसं नाही अशात हे कधी पंचनामे करणार आणि कधी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणार अशी टिकाही दरेकर यांनी यावेळी केली. शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे पैसे भरूनही त्याला विम्याचे पैसे मिळत नाही या बाबतीतही मी शासनाला सूचना दिल्या आहेत. या सर्व मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवू जर आठवड्याभरात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाही तर भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Published on: 05 October 2020, 07:15 IST