1. बातम्या

येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यात होणार मुसळधार पाऊस


मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या ४८ तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून संथगतीने सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे. मुंबईत सकाळी साडे अकरा पर्यंत १५ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम किनारी अद्यापही ढग आहेत, येथे ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आता पावसाची जोर कमी झाला आहे, पण तो पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागााचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल.

तर उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरू केला. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरु झालेला पावसाने दुपारपर्यंत जोर कायम होता. मुंबईतल्या सखल भागात पावसाची पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. यात प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग आणि मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत कमी झाला होता. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली असून पहाटे पावसाचा जोर वाढला होता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters