गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेरणी करावी का नाही या चिंतेत होता. परंतु काटी, भोडणी, बावडा, वडापुरी या भागात पंधरा दिवसांपासून दमदार पाऊस झाला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा पुसल्या गेल्या आहेत. या पावसामुळे रेंगाळलेल्या पेरणीला गावोगावी गती आली असून येथील बळीराजा सुखावला आहे.
तालुक्यात मागील पाच वर्षापासून सातत्याने पावसाच्या हुलकावणीमुळे बळीराजा वर्षानुवर्ष आर्थिक संकटात सापडतो आहे. त्यामुळे शेतीत जायचे तर पाणी नाही, शेती विकायची तर दर नाही. यातच शेती संपून पुढे काय करायचे असा सवाल शेतकऱ्यांपुढे उभा असायचा, मात्र यंदा सुरुवातीलाच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. ज्या शेतात अंकुर उगवले गेले नव्हते, त्या शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पुन्हा पेरण्या सुरू केल्या आहेत. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे.
तालुक्याच्या हद्दीत रोहिणी नक्षत्रात कधीही पाऊस होत नाही मात्र यंदा पावसाने चांगली हजेरी लावली. मृग नक्षत्रात दमदार पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तवले जात असल्यामुळे जवळपास 30 ते 40 टक्के पेरण्या शेतकरी उरकू लागले आहेत. काही भागात बैलजोडीच्या साह्याने तर अनेक गावात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, पेरणी सुरू आहे. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळाले आहे व चलन फिरू लागले आहे. पावसामुळे शेत मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही विविध पिकांमधून उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळेल अशी आशा लागून राहिली आहे. करोनाची धास्ती व पाऊस नसल्यामुळे खोळंबलेली कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरीही कामात गुंतला आहे.
Published on: 08 July 2020, 06:14 IST