राज्यात मॉन्सूनने जोर धरला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भात मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. नाशिक, सांगली, पुणे, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पिकांना फायदा होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गहाघर येथे सर्वाधिक १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यानंतर पिकेही अंकुरली होती. मात्र महिन्याच्या मध्यंतरीपासून पावसाने खंड दिला, त्यामुळे काही ठिकाणी पिके कोमेजून गेली.
दरम्यान निफाड, मालेगाव, सटाणामध्ये दमदार पाऊस झाला. कोकण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु काल पावसाने दमदार सुरुवात केली आहे. अनेक भागातील ओढे, बंधारे भरले आहेत. सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रातभर पावसाची रिपरिप सुरु होती. पुणे जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने बॅटिंग सुरु केली आहे. गेल्या सात ते आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर मात्र परत मॉन्सून पाऊस सक्रिय झाला आहे. औरंगाबाद, जालना, या जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली.
दरम्यान सर्वत्र पोहोचलेल्या मॉन्सून आपला रंग दाखवत असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवसात पूर्व भारत आणि मध्य भारतात जोरदार पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही पुढील तीन दिवसात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. बिहार आणि विदर्भात १ ते ४ जुलै दरम्यान पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
Published on: 01 July 2020, 12:53 IST