काही दिवसांपासून शांत असलेला मॉन्सून आता आपले रुप दाखवत आहे. मुंबई आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागामार्फत आज (4 जुलै ) मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. यासह मध्य आणि उत्तर भारताच्या काही राज्यातही पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते पुढील काही तासात २० पेक्षा जास्त राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात मुंबईसह कोकण आणि गोवामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिमी राजस्थानच्या काही भागात हवामान कोरडे राहिल.
दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नदी, धरणं यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली दिसून येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण महिनाभरातच पूर्ण क्षमतेने भरलं असून यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोरी व हतनूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोड क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील आवक वाढली आहे. सर्वसामान्य स्थितीत असलेला मॉन्सूनची आस, गुजरात आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यातच अरबी समुद्रावरुन बाष्पाचा पुरवठा होत असल्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर मराठावाड्यातील काही ठिकाणीही पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Published on: 04 July 2020, 02:19 IST