News

गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे. आज कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडेल, तर उद्यापासून कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाची उघडीप असेल.

Updated on 31 August, 2020 7:56 AM IST


गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगितले जात आहे. आज कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडेल, तर उद्यापासून कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाची उघडीप असेल. दरम्यान काही भागात हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य प्रदेशाच्या पश्चिम भाग ते राजस्थानच्या पूर्व भाग दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे.

या क्षेत्राची तीव्रता कमी होऊ लागली आहे. तसेच राजस्थानच्या भागात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय मॉन्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानमधील जैसलमेरपासून ते नागालँण्ड पर्यंत सक्रिय आहे. दक्षिण उत्तर तमिळनाडू ते कोमोरिन परिसर व रायलसीमाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. राज्यातील पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान तसेच पावसाची उघडीप असेल तर कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ हवामानासह काही प्रमाणात ऊन पडणाच्या अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान विदर्भात यंदा चांगला पाऊस होत आहे. रविवारी पावसाने विदर्भात उडीप घेतली. मात्र मध्य प्रदेशातील तुडुंब भरलेल्या प्रकल्पांमधून तसेच विदर्भातील काही प्रकल्पांमधून सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूर्व विदर्भातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. याचा फटका भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांना बसला असून या भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात नवेगाव खैरी तसेच तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे १६ ते १४ दरवाजे उघडण्यात आले. परिणामी नदीकाठावरील २५ गावांना पुराचा वेढा पडला. त्यामुळे २९०७ कुटुंबातील ११०६४ व्यक्ती बाधित झाले.

English Summary: Heavy rain forecast in Konkan
Published on: 31 August 2020, 07:54 IST