पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. तर उद्या कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून आसामपर्यंत विस्तारला आहे. आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या उपसागरात ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.
मध्य प्रदेशापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच हवेच्या खालच्या थरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाला हवामान होत आहे. आज कोकणामधील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्नामाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद मधील ६ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. तर जालन्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Published on: 31 July 2020, 06:57 IST