हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दि. 26 नोव्हेंबर पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही राज्यात अनेक ठिकाणी विजांसह गारपीटीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे अजुन नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा आणि बटाटा पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमधील वेचणीला आलेला कापूस पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यालातील फळबागांना गारपिटीचा फटका बसला आहे. मागील हंगामात पुरेसा पाऊल न झाल्याने दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील हंगामात जास्त पिक आलं नाही. आणि आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पनाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यासंर्दभात सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला, कांदा, द्राक्ष अशा पीकांना मोठा तडाखा बसला. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातुन केली आहे.
Published on: 27 November 2023, 02:15 IST