1. बातम्या

देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट; दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आहे धोका

देशात कोरोनाचे संकट असताना आता आणखी एक संकट आले आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशासह राज्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढणार आहे. दुपारच्या वेळी सावध आणि सर्तक राहा, दुपारी १ पासून ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान  बाहेर जाणे टाळा. असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.   हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, पुर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट असेल. उष्णतेच्या लाटेचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील कमाल तापमान ४५ अंशांच्या वरती असते.

अनेक राज्यात वाढलेलेल्या तापमानामुळे लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. राजस्थानच्या चूरू येथे ५० डिग्रीच्यावर तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशाच्या बांदा आणि प्रयागराजमध्ये तापमान ४८ अंश सेल्सिअस आहे. दरम्यान महिन्याच्या शेवटी म्हणजे २९ -३० मे नंतर लोकांना आराम मिळण्याची शक्यता आहे.  पुढचे दोन म्हणजे २८ मेपर्यंत तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी चूरू हे जगातील सर्वात दोन जागांमधली एक झाले आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त उष्णता आहे. याशिवाय पाकिस्तानमधील जेकबाबादचे तापमानही ५० अंश नोंदविण्यात आले. हरियाणामध्ये हिसारमधील पाराही वाढला असून तो ४८ अंशांवर पोहचला आहे.  उत्तरप्रदेशातील बांदामध्येही समान तापमानाची नोंद झाली.  राजधानी दिल्लीतील तापमानाने १८ वर्षाचा विक्रम मोडला आहे. मंगळवारी येथील तापमान ४७.६ अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवस वायव्य भारत, मध्य भारत आणि पुर्वेकडील भारतातील जवळपासच्या अंतर्गत भागात वारे वाहतील.  दरम्यान या आठवड्याच्या शेवटी हलका पाऊस होऊ शकतो.  हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जूनला मॉन्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल.  सर्वसाधरणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters