कोरडया हवामानाची स्थिती आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होऊन राज्यात सध्या लाहीलाही निर्माण होत आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती दूर होऊन गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यातच राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली. गेल्या तीन दिवसांपासून या भागातून कमी उंचीवरून उष्ण वारे राज्याकडे येत आहेत. परिणामी राज्याच्या दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे.
सोमवारी राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सध्या विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मराठवाडा, विदर्भासह खानदेशातील तापमान ४३ ते ४६ अंशाच्या वर गेल्याने या भागातील भाजीपाल्यासह फळपिके वाढत्या बाष्पीभवनाने होरपळू लागली आहेत. भाजीपाल्यासह केळी, संत्रा, मोसंबी, आंबा ही फळपिके वाढत्या तापमानाने प्रभावित होत आहेत. केवळ भूस्तरावरीलच नव्हे तर जमिनीच्या तापमानातही वाढ झाल्याने पिकांची वाढ खुंटणे मुळ सुकण्याचे प्रकार घडू लागली आहेत.
उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. आज देशात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील पाच दिवस विविध देशाच्या भागात उष्ण लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. आज विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
इतर देशातही तापमान वाढले असून इराकमधील तूज शहरात जगभरातील उच्चांकी ५०.५ अंश सेल्सिअस तर पाकिस्तानातील नवाबशाह शहरात ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. या उष्ण शहारांच्या यादीत पश्चिम राजस्थानातील चुरू शहर चौथ्यास्थानावर तर नागपूर आणि चंद्रपूर अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर असल्याची जगातील हवामानाच्या नोंदी घेणाऱ्या अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळावर नोंद झाली आहे.
Published on: 26 May 2020, 12:13 IST